जगात संगणक आलेत. त्याला इंटरनेटची जोड मिळाली. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाची दारे उघडली. संपूर्ण जग आभासी पद्धतीने जोडला गेला. माहितीची देवाणघेवाण होऊ लागली. सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाने माणसाचे व्यावहारिक जीवन बदलले आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ने नव्या जगाची सुरवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत चॅटजीपीटीसारखे चॅटबॉट्स, मिडजर्नीसारखे इमेज जनरेटर्स, व्हाट्सएप मेटा, जेमिनी आणि मायक्रोसॉफ्ट बिंग सारख्या अनेक प्रगतप्रणाली उदयास येत आहेत.
अनेकांना प्रश्न पडतो की, कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकं काय आहे. ते काम कसं करतं. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी प्रोग्राम केलेली मशीन होय. शिकणे, तर्क करणे, समस्या सोडवणे, समज आणि भाषेचे आकलन ही सर्व संज्ञानात्मक क्षमता त्यात आहेत. आजच्या जगात, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे आणि आपल्या जीवनात अनेक बदल घडवून आणत आहे. जगात एआय व मशीन लर्निंग मॉडेल्स विषयी बऱ्याच काळापासून काम सुरू आहे. हे तंत्रज्ञान आहे जे मशीनला मानवी बुद्धिमत्तेसारखे कार्य करण्यास सक्षम करते. यात शिकणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि स्वयंचलितपणे कार्ये पूर्ण करणे समाविष्ट आहे. एआय मशीन लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, संगणक दृष्टी आणि रोबोटिक्स सारख्या विविध तंत्रज्ञानांचा वापर करते. या प्रणालीत मोठ्या प्रमाणात डेटावर प्रशिक्षित केल्या जातात. या डेटामध्ये मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ आणि ऑडिओचा समावेश असू शकतो. डेटाचे विश्लेषण करून भविष्यातील डेटा कसा असेल, याचा अंदाज लावू शकतात. अनेक क्षेत्रांमध्ये, एआय मानवांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने आणि अचूकपणे कार्य करू शकते. जनरेटिव्ह एआय टूल्सच्या माध्यमातून अनेक बदल झपाट्याने होत असल्याने शिक्षणापासून मार्केटिंगपर्यंत उत्पादन डिझाइनपर्यंतच्या क्षेत्रात फायदेशीर ठरणार आहे.
एआय तंत्रातील प्रगतीमुळे केवळ कार्यक्षमतेत वाढ झाली नाही, तर काही मोठ्या उद्योगांसाठी पूर्णपणे नवीन व्यवसाय संधींचे दरवाजेही उघडले आहेत. अल्फाबेट, ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यासह आजच्या बऱ्याच मोठ्या आणि सर्वात यशस्वी कंपन्यांसाठी एआय केंद्रस्थानी बनले आहे.
आज लेखनाच्या क्षेत्रात ही प्रणाली लेख, ब्लॉग पोस्ट आणि मार्केटिंग सामग्री सारख्या विविध प्रकारची सामग्री स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी वापरली जात आहे. मजकूर आणि भाषण एका भाषेतून दुसऱ्या भाषेत त्वरित आणि अचूकपणे भाषांतरित करता येत. सध्या साहित्यिक दर्जाचे लेखन किंवा शुद्धलेखन करण्यास सक्षम नाही. मात्र, लेखकांना संशोधन करण्यात, कल्पना विकसित करण्यात आणि त्यांचे लेखन सुधारण्यात मदत करीत आहे. या तंत्रज्ञानाचे अनेक फायद्यांबरोबरच काही आव्हानंही आहेत. काही लोकांना या तंत्रज्ञानामुळे नोकरी जाईल, अशी भीती आहे. या आव्हानांवर मात करणे आणि एआयचा जबाबदार वापर योग्य करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे आणि भविष्यात आपल्या आयुष्यात आणखी अधिक मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post