काँग्रेसला चाळीसहून कमी जागा मिळतील
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 पार जागा मिळतील. तर काँग्रेसला 40 हून कमी जागांवर समाधान मानावे लागेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर मतदारसंघात अनुराग ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
या निवडणुकीत एकीकडे राहुल बाबा आहेत, जे दर 6 महिन्यांनी सुट्टी साजरी करतात आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी 23 वर्षांपासून सुट्टीच घेतलेली नाही. तसेच मोदी दिवाळी देखील सीमेवर लष्कराच्या जवानांसोबत साजरी करतात. देशातील जनतेसमोर दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत, असे अमित शाह म्हणाले. तसेच, अयोध्येतील राम मंदिर आणि पाकिस्तानजवळील अणुबॉम्बबाबतच्या वक्तव्यावरून अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राहुल आणि त्यांची बहीण सुट्ट्यांसाठी शिमल्यात येतात, पण रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला हजर राहिले नाहीत. हे लोक अयोध्येतील राम मंदिरात जात नाहीत, कारण त्यांना त्यांच्या व्होटबँकेची भीती वाटते, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
8 राज्यांतील 58 जागांवर मतदान
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात 429 जागांवर मतदान झाले. शेवटच्या 56 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58 जागांवर 57.70 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99% आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 51.35% मतदान झाले.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
27 मे रोजी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार
फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची पतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांनाही होती. गेलया आठवड्यातच बोर्डाच्या वतीने बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्या नंतर आता विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची मोठी बातमी आहे. 27 मे रोजी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहे.
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर
अनिल परब यांना ठाकरे गटाची उमेदवारी
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी दोन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनिस, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील, नाशिक शिक्षकमधून किशोर दराडे आणि कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. या विद्यमान आमदार विलास पोतनिस यांची उमेदवारी कापून परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नाशिकमध्ये 22 तास बत्ती गुल
जळगावमध्ये भारनियमन, तर संभाजीनगरमध्ये विजेचा लपंडाव
एकीकडे राज्यात उष्णतेची तीव्र लाट आलीय. भुसावळचे तापमान सर्वाधिक 46.9 वर नोंदवले गेले आहे. त्यातच महावितरणकडून संतापाचा शॉक दिला जात आहे. नाशिकमध्ये 22 तास बत्ती गुल होती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकलहरे सबस्टेशनला टाळे ठोकले. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजेचा लपंडाव सुरु आहे. जळगावमध्ये भारनियमन सुरु झाल्याचा प्रकार घडला. जळगाव जिल्ह्यात जमावबंदी घोषित करण्याची वेळ, असून पारा 45 डिग्रीवर पोहोचल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निघाले आहेत.
एप्रिल-मेमध्ये तापमानाचा विक्रम मोडला
उष्णतेची लाट 3 पट अधिक
एप्रिल 2024 ने भारतातील उन्हाळ्याचे सर्व विक्रम मोडले. या वर्षी उत्तर भारतात इतिहासातील सर्वात उष्ण एप्रिल होता. हवामान विभाग म्हणजेच IMDच्या म्हणण्यानुसार, यावर्षी एप्रिलमध्ये येथील सरासरी तापमान सामान्यपेक्षा 2 अंश सेल्सिअसने जास्त होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. तापमान वाढल्यानं त्रस्त असलेल्या सर्वांसाठीच पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे.
निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीची चोरट्यांनी केली हत्या
घरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शनिवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केली. यादरम्यान अधिकाऱ्याच्या पत्नीने चोरट्यांना विरोध केल्यामुळे तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये अमरावतीचे सहा धावपटू धावणार
४३ वर्षीय महिला सलग दुसऱ्यांदा सहभागी होणार
जगातील सर्वांत खडतर मॅरेथॉन पैकी एक असलेली ९० कि.मी. ची कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा येत्या ९ जून २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन, पिटरमटिर्झबर्ग येथे होणार आहे. या स्पर्धेत १३२ देशांमधून धावपटू सहभाग नाेंदवित असून, अमरावती येथील सहा धावपटू सहभागी होणार आहेत. यात जिल्ह्यातील एकमेव ४३ वर्षीय महिला सलग दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे. कॉम्रेड ९० कि.मी. मॅरोथॉनला अल्टिमेट ह्युमन रेस म्हणून ओळखल्या जाते. यावर्षी ९७ वी मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरापासून सकाळी ५.३० वाजता सुरू होणार असून, ती पिटरमटिर्झबर्ग या शहरामध्ये संध्याकाळी ५.३० वाजता समारोप होणार आहे. या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील सेवा निवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलिस कर्मचारी राजेश कोचे, पोलिस निरीक्षक सतीश उमरे व म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला साळुंखे (बद्रे) यांचा समावेश आहे.
मुंबई महानगरात ३० मेपासून ५ टक्के पाणी कपात
र्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात गुरूवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र सन २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे.
वीज बील थकबाकीमुळे जल जीवन मिशन अडचणीत
नागपूर जिल्ह्यातील गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना
जल जीवन मिशन अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या १३०२ पैकी ४३० योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजनांची कामांची सुरु आहेत. तर काही गावांतील कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. पाणीपुरवठा योजनांची जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी असल्याने जल जीवन मिशनच्या ३०० हून अधिक योजना अडचणीत सापडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली असताना योजना पूर्ण होवूनही वीज पुरवठा नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचार्इचा सामना करावा लागत आहे.
Discussion about this post