सावरटोला येथे ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा जागीच करून अंत
सोनवाणे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.९ फेब्रुवारी-
शेतात असलेला ट्रॅक्टर घरी घेऊन जात असताना,तलावाच्या पाळीवरून ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा जागीच करुण अंत झाला.
सदर दुर्घटना सावरटोला येथे दुपारी२.३० ते ३.०० वाजेच्या दरम्यान घडली.
दुर्योधन चारमल सोनवाणे (वय २९)वर्षे राहणार सावरटोला असे मृतक चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील शेतकरी किशोर तरोणे यांच्या मालकीचा नवीन ट्रॅक्टर, चालक मृतक दुर्योधन सोनवाणे घरी शेतातून नेत होता. शेतातून पांदण रस्त्याने ट्रॅक्टर काढून,सरळ तलावाच्या पाळीने घराच्या दिशेने निघाला.परंतु ट्रॅक्टरचे संतुलन बिघडून ट्रॅक्टर तलावाच्या पाळीवरून शेतात कोसळला. यातच दुर्योधनचा जागीच करून अंत झाला.
सावरटोला येथील चारमल (बंडू) सोनवाणे यांचा २९ वर्षीय दुर्योधन हा एकुलता एक मुलगा,या दुर्दैवी अपघातात काळाने हिरावून घेतला.त्यामुळे सोनवाणे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या दुर्योधनच्या मृत्यूने सावरटोला गावावर शोककळा पसरली आहे. सारा गाव दुर्योधनच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळला.
अर्जुनी मोर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून,प्रेत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
त्याच्या मागे आई-वडील व २ बहीणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Discussion about this post