News34
चंद्रपूर – चंद्रपूर शहराच्या वडगाव प्रभागातील अनेक घरांमध्ये 28 जुलै रोजी पहाटेपासून अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
प्रभागातील मित्र नगर,दत्तनगर, शंकर गृहनिर्माण सोसायटी ,अपेक्षा नगर ,भावनाथ सोसायटी, वडगाव जुनी वस्ती मधील सोमय्या पॉलिटेक्निक रोड, नानाजी नगर इत्यादी भागातील घरांमध्ये पहाटे चार वाजेपासून पाण्याचा शिरकाव झाला.
अचानक घरात पाणी आल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.मात्र पाऊस थांबल्यानंतर सकाळी 10 वाजेपासून पाणी ओसरणे सुरू झाल्याने लोकांना दिलासा मिळाला. आज सकाळपासून जनविकास सेनेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख, जनविकास महिला आघाडीच्या मनीषा बोबडे , युवा आघाडीचे अक्षय येरगुडे इत्यादी कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
जुलै महिन्यात दुसऱ्यांदा वडगाव प्रभागातील अनेक परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान झाले.शंकर गृहनिर्माण सोसायटीतील घरे व विविध अपार्टमेंट्सच्या तळमजल्यावरील फ्लॅट्स तसेच संपूर्ण परिसर जलमय झाला. दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी पाणी ओसरले नव्हते.
पूरग्रस्त भागाकडे मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष… पप्पू देशमुख
एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका बसल्याने वडगाव प्रभागातील बोरवेल व विहिरी हे पाण्याचे स्त्रोत दुषित झाले.प्रभागात ठिक-ठिकाणी पाणी साचले असुन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.दत्तनगर परिसरात एक डेंगू चा रुग्ण आढळला.मात्र महानगरपालिकेने पुरेशा प्रमाणात स्वच्छता अभियान, फवारणी, ब्लिचिंग पावडर मारणे इत्यादी उपायोजना केलेल्या नाहीत.
अनेक पूरपीडित नागरिकांचा सर्व्हे झालेला नसल्याने ते शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाचे पूरग्रस्त वडगाव प्रभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून केवळ थातूर-मातूर उपाययोजना करण्यात येत असल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.
पुरामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिणामकारक उपायोजना करावी व सर्व पूरपीडित नागरिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.
Discussion about this post